भारतातील आयकर भरणाऱ्या सर्व करदात्यांसाठी एक महत्वाची बातमी म्हणजे आयकर विभागाचे येऊ घातलेले नवीन पोर्टल. हे नवीन पोर्टल दिनांक ७ जून रोजी अस्तित्वात येणार असून यात करदात्यांना आपले आयकर विवरण भरणे सोपे होईल अशा पद्धतीचे बदल करण्यात आले आहेत. यासाठी म्हणून दिनांक १ जून ते दिनांक ६ जून पर्यन्त आयकर विभागाचे पोर्टल हे बंद राहणार आहे. आयकर संबंधीत आपले कोणतेही काम असेल तर ते दिनांक ३१ मे २०२१ पर्यन्त पूर्ण करण्यास आयकर विभागाने आपल्या ट्विटमध्ये सांगितले सांगितले.
नव्या पोर्टलचे नेमके फायदे कोणते?
१. आपले आयकर विवरण पत्र भरल्यानंतर कमीत कमी वेळात ते आयकर विभागाकडून प्रोसेस केले जाईल. याचा फायदा आयकर परतावा पटकन मिळण्यासाठी होईल.
२. नवीन पोर्टलवरुन आपल्याला आयकर पत्र भरण्यासाठी एक सॉफ्टवेअर डाउनलोड करता येईल ज्याद्वारे आपण आपले आयकर पत्र हे सहजरित्या भरू शकता.
३. या नवीन पोर्टलवर आपल्याला कॉल सेंटरची सुविधा उपलब्ध असेल ज्याचा आपण कोणतीही शंका आल्यावर त्या शंकेचे निरसन करण्यासाठी म्हणून उपयोग करू शकता.
४. सध्याच्या जुन्या पोर्टलमध्ये जर आपल्याला आयकर भरायचा असल्यास केवळ नेट बँकिंग द्वारे भरता येतो परंतु नवीन पोर्टल मध्ये आपल्याला आयकर भरण्यासाठी upi सारखे पर्याय सुद्धा उपलब्ध असतील. याचा वापर करून आयकर भरण्याची प्रक्रिया सोपी होईल.
५. या पोर्टलचे एक मोबाइल app सुद्धा कालांतराने उपलब्ध होणार आहे ज्याचा फायदा सर्व करदाते घेऊ शकतात.
करदात्यांसाठी आयकर भरणे आणि आयकर विवरण पत्र भरणे सोपे जावे आणि अधिकाधिक करदात्यांनी यात भाग घ्यावा यासाठी भारत सरकारने हे अतिशय योग्य पाऊल उचलले असून याचा फायदा करदाते तसेच भारत सरकार या दोघांना होणार आहे.
टीप – आर्थिक वर्ष २०१९-२० चे विवरण पत्र भरायचे कुणाचे राहिले असेल तर ३१ मार्च २०२१ ही शेवटची तारीख असून त्यानंतर कुणालाही आपले २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचे आयकर विवरण पत्र भरता येणार नाही.
– CA Shantanu Paranjape (sdparanjpe@gmail.com/7020402446)